(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील Flow Zone Art’s and Fitness या संस्थेच्या दोन विद्यार्थिनींनी जिम्नॅस्टिक्स क्रीडाप्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय पातळीवरील निवड निश्चित केली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुमेधा कोलते आणि श्रेया तारे यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींना संस्थेचे संस्थापक व प्रमुख प्रशिक्षक प्रसन्नजित कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि कौशल्यविकासाच्या जोरावर विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध करत जिल्हास्तरावर प्रभावी कामगिरी केली. त्यातूनच त्यांना विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. Flow Zone Art’s and Fitness ही संस्था रत्नागिरीत गेल्या अनेक वर्षांपासून कला आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करीत आहे. जिम्नॅस्टिक्ससह विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यावर संस्थेचा भर आहे.
संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही जिल्हा आणि विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असून, काही विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावरही आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली आहे. सुमेधा कोलते आणि श्रेया तारे यांची विभागीय स्तरावरील निवड ही त्या सातत्यपूर्ण यशपरंपरेतील आणखी एक महत्त्वाची नोंद ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, पालक आणि संस्थेतील सहकाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.


