(सातारा / वृत्तसंस्था)
खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे 12 सप्टेंबर रोजी आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर 12 दिवसांनी उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि औंध पोलिसांना यश आले. चारित्र्याच्या संशयावरून पत्नी मनीषा हिची डोक्यात खोरे घालून हत्या केल्याप्रकरणी राहुल संभाजी कोळी (रा. मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. सलग बारा दिवस शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासत त्यातील धागेदोरे जोडत पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली. राहुल कोळी याने पत्नी मनीषा हिची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले गावच्या हद्दीत 12 सप्टेंबर रोजी सकाळी झीरो पॉईंटजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची नोंद औंध पोलीस ठाण्यात करण्यात आली. मृतदेहाजवळ त्याची ओळख पटवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि औंध पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र पथकांनी अहोरात्र तपास सुरू ठेवला.
मृतदेह सापडलेल्या ठिकाणाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व मार्गांवरील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. एका फुटेजमधील माहिती दुसऱ्या फुटेजशी जोडत पोलिसांनी वाहनांचा आणि व्यक्तींचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींमधील महिलांचे वर्णन मृतदेहाशी जुळत नसल्याचे समोर आले. त्यामुळे तपास पथकांनी सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातही शोधमोहीम राबवली. मात्र, सुरुवातीला तपासाला ठोस धागेदोरे मिळत नव्हते.
तपासादरम्यान शेकडो सीसीटीव्ही फुटेजची छाननी केल्यानंतर एका कॅमेऱ्यात दिसलेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. त्या क्रमांकाच्या आधारे वाहनाच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर पोलीस पथक मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे पोहोचले आणि तपासाला निर्णायक दिशा मिळाली. मृत महिलेचा पती राहुल संभाजी कोळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला राजाचे कुर्ले, ता. खटाव येथे आणून तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.
ही कारवाई एलसीबीचे पोलीस पथकाने केली. कोणताही पुरावा किंवा ठोस धागेदोरे उपलब्ध नसताना तपास करून गुन्ह्याचा उलगडा करणाऱ्या पोलीस पथकांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कौतुक केले आहे.


