(मुंबई)
मध्यप्रदेशात काही बालकांना खोकला होऊन Coldrif Syrup पिण्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या सिरपच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात आली आहे.
नागपूर FDAच्या तपासणीत शासकीय रुग्णालयांमध्ये या सिरपचा पुरवठा नाही असे आढळले, मात्र एका खासगी औषध विक्रेत्याकडे स्टॉक आढळला. या सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल येईपर्यंत त्याची विक्री करणे टाळावे, असे निर्देश दिले आहेत.

FDAने स्पष्ट केले आहे की मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काही मुलांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना Coldrif Syrup (Phenylephrine Hydrochloride, Chlorpheniramine Maleate Syrup) शी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. संदर्भित Batch No. SR-13, मे 2025 मध्ये तयार, एप्रिल 2027 पर्यंत वैध, Sresan Pharma, Tamil Nadu यांनी तयार केलेले आहे. या सिरपमध्ये विषारी Diethylene Glycol (DEG) असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सर्व औषध विक्रेते आणि नागरिकांना Coldrif Syrup (Batch No. SR-13) विक्री, वितरण आणि वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. जेथे स्टॉक असेल, तेथील माहिती स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणाला त्वरित कळवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार:
- 2 वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ किंवा सर्दीवरील औषध देऊ नयेत.
- 5 वर्षांखालील मुलांसाठी औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत, कारण बहुतेक खोकला व सर्दीचे आजार स्वतःहून बरे होतात.
- नैसर्गिक उपायांना प्राधान्य द्यावे – पुरेसे पाणी पिणे, विश्रांती, आधार देणारे उपाय.
- डॉक्टरांच्या देखरेखीखालीच औषधे द्यावीत; डोस आणि कालावधीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक.
- एकाच वेळी अनेक औषधे मिसळू नयेत.
- सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी GMP मानकांनुसार तयार केलेली उच्च दर्जाची औषधे वापरावीत.
- सुरक्षिततेसाठी, पालकांनी बालकांना या औषधांचा वापर टाळावा आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

