( बीड )
राज्यात दसरा मेळाव्यांचा उत्साह शिगेला असताना बीड जिल्ह्यातील नारायणगडावर झालेल्या मराठा समाजाच्या विराट मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजारपणावर मात करून भावनिक भाषण करत समाजाला मार्गदर्शन केले. रुग्णालयातून थेट मेळाव्यासाठी गडावर दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम दर्शन घेतले. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. त्यानंतर व्यासपीठावर येऊन त्यांनी शेतकरी आणि मराठा समाजातील बांधवांना थेट संबोधित केले.
“मायबाप हो, मला बोलायला लई त्रास होतोय, पण हा गड नगद आहे म्हणून ताकद मिळतेय. मी काही दिवसांचा पाहुणा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपले विचार सुरू केले आणि वातावरण क्षणात भावूक झाले. त्यांनी समाजाला आवाहन करताना स्पष्ट सांगितले की, मराठ्यांनी यापुढे शासक व्हायला हवे आणि प्रशासकही व्हायला हवे. प्रशासनात ताकद असते, त्यामुळे मुलांना तहसीलदार, पीएसआय, कलेक्टर बनवा, प्रत्येक क्षेत्रात आपली लेकरं पुढे करा, असं ते म्हणाले. “सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक बोगस आरक्षण घेतलेले लोक बसले आहेत, त्यामुळे मराठ्यांनी आता खंबीरपणे पुढे यावं, प्रमाणपत्र काढून घ्यावं आणि आपला हक्काचा वाटा घ्यावा,” असा थेट संदेश त्यांनी दिला.
ओबीसी समाजावर दोषारोप टाळत त्यांनी स्पष्ट केलं की सर्वसामान्य ओबीसी बांधव दोषी नाहीत. “प्रत्येक समाजात दोन-तीन टक्के लोक आणि त्यांचे नेते गोंधळ करतात. त्यामुळे ओबीसीला दोष द्यायचा नाही, पण मंत्री छगन भुजबळ यांच्यासारखे काही जण नेहमी भडकावण्याचे काम करतात,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
यानंतर जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वळत सरकारला दिवाळीपर्यंतची अंतिम मुदत दिली. “दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना ७० हजार रुपये हेक्टरी मदत द्या. पिकं वाहून गेलेल्यांना दीड लाख रुपयांची भरपाई द्या. जनावरं, धान्य, घर वाहून गेलेल्यांना शंभर टक्के मदत द्या. मागील वीस वर्षांत ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्या. शेतीला नोकरीचा दर्जा द्या आणि पीकविमा पूर्णपणे लागू करा. हे सगळं दिवाळीपूर्वी झालं नाही तर शेतकऱ्यांची बैठक घेऊन मोठं आंदोलन उभारू,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
“माझ्या लेकरांना आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे माझं काम पूर्ण झालंय. गरीब मराठा समाजाचे हाल मला बघवत नव्हते म्हणून रात्रंदिवस झटलो. मी कधीच खोटं बोललो नाही. आता मराठ्यांनी शासक व्हायचं आणि प्रशासकही व्हायचं. समाजाला पुढे न्यायचं,” असे म्हणत त्यांनी आपले विचार संपवले. त्यांच्या अश्रुपूर्ण उद्गारांनी नारायणगडावरील लाखो मराठा बांधव भावूक झाले आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमला.

