(माणगाव / वृत्तसंस्था)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथील न्यू आनंद भुवन हॉटेलसमोर सफारी कार आणि दुचाकी यांच्यात मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात श्रीवर्धन तालुक्यातील दिघी-कोळीवाडा येथील जनार्दन चांग्या गोवारी (वय ५५) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उपलब्ध पोलीस नोंदीनुसार, या अपघातात एमएच ०६ सीएन १३४५ क्रमांकाची दुचाकी आणि एमएच ०३ ईएल २३४५ क्रमांकाची सोनेरी रंगाची सफारी कार सहभागी होती. या प्रकरणात मुंबईतील गोवंडी येथील महेश शिवदास हिरवे (वय ३८) यांचे नाव आरोपी म्हणून नोंदविण्यात आले आहे.
वाहन निष्काळजीपणे चालविल्यामुळे हा अपघात घडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.


