(मुंबई / वृत्तसंस्था)
संशयास्पद संदेश, वेब लिंक किंवा फोन नंबरमागे फसवणुकीचा धोका आहे की नाही, हे तपासण्यासाठी Truecallerने ‘Scam Checker’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सुविधेमुळे Truecallerच्या फसवणूक शोधण्याच्या क्षमता एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. वापरकर्त्यांना वेब लिंक तपासता येईल, फोन नंबरची माहिती शोधता येईल तसेच समुदायाने शेअर केलेले फसवणुकीसंबंधी अहवालही पाहता येतील. ही सेवा Truecallerच्या विद्यमान कॉलर ओळख आणि स्पॅम संरक्षण सुविधांचा विस्तार आहे.
Truecallerने आपल्या न्यूजरूम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद संदेश किंवा संभाव्य फसवणुकीचा प्रयत्न आढळल्यास वापरकर्ते Scam Checkerच्या मदतीने त्याची पडताळणी करू शकतात. ही सेवा फसवणूक शोधण्याच्या क्षमतेला 50 कोटी (500 million) वापरकर्त्यांच्या समुदायाकडून मिळणाऱ्या माहितीशी जोडते. संशयास्पद लिंक हानिकारक आहे किंवा फिशिंगशी संबंधित आहे का, हे तपासता येते. त्याचप्रमाणे, फोन नंबर शोधल्यानंतर Truecallerची प्रणाली आणि समुदायाकडून मिळणाऱ्या संकेतांच्या आधारे उपलब्ध माहिती पाहता येते.
Scam Checkerमध्ये ‘Scamfeed’ अहवालांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे समुदायातील इतर सदस्यांनी नोंदवलेल्या अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांची माहिती वापरकर्त्यांना मिळू शकते. Truecallerच्या मते, एखाद्या वापरकर्त्याला आलेल्या संदेशाशी किंवा परिस्थितीशी संबंधित फसवणुकीचे अहवाल शोधणे यामुळे शक्य होईल. वापरकर्ते स्वतःचे प्रश्नही विचारू शकतात. त्यानुसार सेवा संबंधित परिणाम उपलब्ध करून देते. यामध्ये समुदायाने नोंदवलेल्या अहवालांसह लिंक किंवा फोन नंबरची तपासणी करता येते.
Scam Checkerची कार्यपद्धती संशयास्पद संदेशांमध्ये आढळणाऱ्या तीन सामान्य घटकांवर आधारित आहे. यामध्ये फोन नंबर, लिंक आणि संबंधित विनंतीमागील कथा किंवा संदर्भ यांचा समावेश आहे. या सर्व बाबी एकाच ठिकाणी तपासण्याची सुविधा मिळत असल्याने त्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांवर जाण्याची गरज राहणार नाही.
या सेवेची घोषणा करताना Truecallerचे सीईओ ऋषित झुनझुनवाला म्हणाले, “Scam Checker आमच्या शोधण्याच्या क्षमतांना समुदायाकडून मिळणाऱ्या माहितीशी जोडते, ज्यामुळं लोकांना संशयास्पद लिंक्स, नंबर्स किंवा तपशीलांची एकाच ठिकाणी पडताळणी करणे शक्य होते.” कंपनी भविष्यात या सेवेत आणखी वैशिष्ट्ये जोडण्याच्या तयारीत आहे. यामध्ये फसवणुकीच्या विविध पद्धतींची सविस्तर माहिती, स्क्रीनशॉट अपलोड करण्याची सुविधा, वापरकर्ता प्रमाणीकरण (user authentication) आणि इतर क्षमतांचा समावेश असेल.
सध्या ‘Truecaller Scam Checker’ अँड्रॉइड ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर त्याची वेब आवृत्ती जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. भविष्यात ही सेवा इतर बाजारपेठांमध्येही उपलब्ध करून देण्याची Truecallerची योजना आहे. त्यानंतर iOSसाठीही सपोर्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे.


