(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेच्या १९ वर्षांखालील गटात देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली. महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली.
मुलांच्या संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भाईशा घोसाळकर कनिष्ठ महाविद्यालय, कडवईचा, तर दुसऱ्या सामन्यात पैसाफंड कनिष्ठ महाविद्यालय, संगमेश्वरचा सहज पराभव केला. अंतिम सामन्यात आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने दादासाहेब सरफरे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबीच्या संघावर मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजेत्या मुलांच्या संघात रुतिक जाधव, देवदास पोवार, प्रणव गोमाणे, सुजल निवळकर, अनिकेत नवेले, उत्कर्ष रावणंग (कर्णधार), यश घवाळी, पार्थ गिड्ये (उपकर्णधार), प्रेम शिंदे, सुजल खानविलकर, केतन साळवी आणि सर्वेश भेरे यांचा समावेश होता.
मुलींच्या संघानेही दमदार खेळ करत उपविजेतेपद मिळवले. या संघात अक्षरा कांबळे, ईश्वरी गुरव, जान्हवी चव्हाण, सिद्धी जाधव, मृणाली कांगणे, श्रुती किंजळे (कर्णधार), सानिका सनगले, शामल पातेरे (उपकर्णधार), वैदेही कान्हेरे, रिद्धी सुवरे, भक्ती शिवगण आणि भूमी कोटकर यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेदरम्यान महाविद्यालयाच्या मुलांच्या संघातील उत्कर्ष रावणंग आणि सर्वेश भेरे, तसेच मुलींच्या संघातील शामल पातेरे यांनी चमकदार खेळाचे प्रदर्शन केले.
दोन्ही संघांना क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांचे मार्गदर्शन लाभले, तर व्यवस्थापिका म्हणून प्रा. देवयानी जोशी यांनी जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना विभागप्रमुख प्रा. विजय मुंडेकर, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनव पातेरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


