(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर कोंडगाव (साखरपा) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ बापू शेट्ये यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे दाभोळे जिल्हा परिषद गटासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संदेश (बापू) शेट्ये यांनी यापूर्वीही पाच वर्षे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून सामाजिक व विकासकामांमधील त्यांच्या सक्रिय योगदानाची दखल घेत त्यांना पुन्हा समितीवर संधी देण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांमध्ये संदेश (बापू) शेट्ये यांचाही समावेश असून, पालकमंत्री डॉ. उदय सामंत तसेच आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या मार्गदर्शन व विश्वासामुळे ही जबाबदारी पुन्हा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना संदेश (बापू) शेट्ये म्हणाले, “पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या विश्वासामुळे मला जिल्हा नियोजन समितीवर पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. या विश्वासाला पात्र ठरत जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करेन.”

