(संगमेश्वर / एजाज पटेल)
कसबा जिल्हा परिषद गटातील निवडणूक वातावरण तापलेले असतानाच अपक्ष उमेदवार मधुरा मिथुन निकम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. विजयाची शक्यता स्पष्टपणे दिसत असतानाही पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक बांधिलकीला प्राधान्य देत त्यांनी घेतलेला हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला असून समाजकारणाच्या दृष्टीने तो भावनिक मानला जात आहे.
डिंगणी गावच्या मधुरा निकम या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महिलांचे प्रश्न, ग्रामविकास तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी त्या सातत्याने पुढाकार घेत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी आहे. त्यांचे पती मिथुन निकम हे गेली दोन दशके डिंगणी गावचे उपसरपंच म्हणून कार्यरत असून भाजपचे संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी आहेत. त्यांच्या विकासाभिमुख कामामुळे परिसरात त्यांचा भक्कम जनाधार निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात मधुरा निकम गेल्यास जनहिताची कामे अधिक गतीने मार्गी लागतील, असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये होता. धाडसी, स्पष्टवक्त्या आणि निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून त्या जनतेच्या समस्या निर्भयपणे सभागृहात मांडतील, या अपेक्षेने कार्यकर्ते, सहकारी, महिला वर्ग आणि युवकांनी त्यांना निवडणूक लढविण्यासाठी जोरदार आग्रह धरला.
नागरिकांच्या या आग्रहामुळेच मधुरा निकम यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता पूर्णतः अपक्ष म्हणून परचुरी पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे ही अपक्ष उमेदवारी जनतेने मनापासून स्वीकारली होती. पक्षापेक्षा व्यक्तिमत्त्व, समाजकार्य आणि अनुभवाला महत्त्व देत नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी डोअर-टू-डोअर प्रचार सुरू केला. प्रचारादरम्यान नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. गावोगावी मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आणि वाढत्या कार्यकर्त्यांच्या संख्येमुळे त्यांचे विजयाचे पारडे जड असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र या निर्णायक टप्प्यावर भाजप जिल्हा निवडणूक संयोजक दीपक पटवर्धन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री व पालकमंत्री उदय सामंत तसेच अनिकेत पटवर्धन यांच्या सूचनेनुसार मधुरा निकम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. पक्षशिस्त आणि संघटनात्मक एकसंघता याला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय अनेकांच्या दृष्टीने आदर्श ठरला आहे.
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना मधुरा निकम म्हणाल्या,
“माझ्या समाजकार्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी मला आग्रहास्तव उमेदवारी अर्ज भरायला भाग पाडले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका जनतेने स्वीकारली आणि मला भरभरून प्रेम दिले. हा पाठिंबा माझ्यासाठी मोठे बळ आहे. मात्र माझे पती भाजपचे तालुकास्तरीय पदाधिकारी असल्याने आणि पक्षाची भूमिका लक्षात घेता, सर्वांना विश्वासात घेऊन मी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मी निवडणुकीत नसले तरी समाजकार्यापासून कधीही दूर जाणार नाही.”
उमेदवारी अर्ज मागे घेताना संगमेश्वर उत्तर तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के, युवा मोर्चा संगमेश्वर अध्यक्ष स्वप्नील सुर्वे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत भावना स्पष्टपणे दिसून येत होत्या.
निवडणूक जिंकण्यापेक्षा निष्ठा, संघटन आणि समाजसेवा महत्त्वाची असल्याचा संदेश देणारा मधुरा निकम यांचा हा निर्णय सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

