(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार असून, त्यांचे विलिनीकरण किंवा समायोजन केले जाणार असल्याच्या चर्चा सोशल मीडिया आणि काही वृत्तमाध्यमांवर सुरू आहेत. मात्र, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून, संबंधित बातम्या निराधार आणि वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे यांनी दिले आहे. पालक, शिक्षक आणि नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे किंवा त्यांचे समायोजन करण्यासंदर्भात राज्य शासनाने अद्याप कोणताही शासन निर्णय (GR) जारी केलेला नाही. त्यामुळे शाळा बंद करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अधिकृत आधार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक शाळेचे विलिनीकरण करणे, शाळा बंद करणे अथवा अशा शाळांची यादी तयार करण्याची प्राथमिक कार्यवाहीही सुरू करण्यात आलेली नाही. विद्यार्थी आणि शैक्षणिक हिताशी संबंधित निर्णय केवळ शासनाच्या अधिकृत आदेशानुसारच घेतले जातात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शैक्षणिक क्षेत्रासारख्या संवेदनशील विषयांबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी संबंधित विभागाकडून माहितीची खातरजमा करावी, जेणेकरून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अनावश्यक संभ्रम निर्माण होणार नाही, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे यांनी केले आहे. नागरिकांनीही केवळ शासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.


