(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा माहोल सध्या चांगलाच तापलेला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उत्साहात प्रचारात गुंतले आहेत. मात्र निवडणुकीदरम्यान कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा मतदारांना प्रलोभन देण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी शहरात येणाऱ्या तीन ठिकाणी स्थिर पथके आणि एक फिरते पथक तैनात करण्यात आले आहे.
देवरुख नगरपंचायत निवडणूक हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा राजकीय सामना समजला जातो. शहरात शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप, रिपब्लिकन पक्ष, मनसे, गाव विकास समिती, समाजवादी पक्ष, आप इत्यादी विविध पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय असल्याने निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. त्यामुळे मतदारांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
शहरात प्रवेश करणाऱ्या महत्त्वाच्या तिन्ही रस्त्यांवर तपासणीसाठी पथके नित्यनेमाने कारवाई करत आहेत..मार्लेश्वर फाटा येथे फिरते पथक प्रमुख निरंजन सोलकर यांच्यासह गणेश शंकर काटकर काम पाहत आहेत. येथेच स्थिर पथक प्रमुख जयदीप प्रभाकर जाधव, पोलीस अमोल अशोक कोठावळे, तसेच व्हिडिओग्राफर ताज महमद बोबडे प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी करत आहेत. पाटगाव तिठा येथेही स्थिर पथकाची नियुक्ती असून सतत निरीक्षण ठेवले जाते. सह्याद्रीनगर तिठा येथे तिसरे स्थिर पथक तैनात आहे.
या सर्व पथकांकडून देवरुख शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर बारीक लक्ष ठेवून तपासणी सुरू आहे. प्रशासनाच्या या सजगतेमुळे निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडण्यास मदत होणार आहे.

