( संगमेश्वर / प्रतिनिधी )
‘कलांगण संगमेश्वर’ द्वारा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. ३१ जुलै रोजी बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेत १३ शाळांतील १९ स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
देवरुख महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. वर्षा फाटक आणि संगमेश्वरी बोली फेम विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री.आनंद बोंद्रे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. बक्षीस वितरण सोहळ्यास स्पर्धेच्या समन्वयक, सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी, सौभाग्य अलंकारचे यशवंत सैतवडेकर, बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाराम गर्दे, सचिव शरद बाईत, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, कलांगणचे अध्यक्ष अमोल लोध आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल देवरुखच्या श्रेया कृष्णा मेस्त्री हिने प्रथम क्रमांक, दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबीच्या अनन्या कुलदीप डोळस हिने द्वितीय तर कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवलीच्या माही गिरीश वनकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, पुस्तके आणि रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावर्षी प्रथमच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याचे मार्गदर्शक शिक्षक देवरुख हायस्कुलचे मंगेश रसाळ सर यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या रोख रकमेची पारितोषिके संपदा जोगळेकर यांच्या मातोश्री वृंदा जोगळेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आली. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन कलांगणचे निबंध कानिटकर यांनी केले.