(संगमेश्वर / एजाज पटेल)
दारूच्या नशेत भरधाव वाहने चालवत निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार चालकांविरोधात संगमेश्वर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत रस्त्याला स्वतःची जहागिरी समजणाऱ्या मद्यपी चालकांवर पोलिसांनी धडक मोहीम राबवत तब्बल सात जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सात मद्यपी चालक पोलिसांच्या जाळ्यात
संगमेश्वर पोलिसांनी राबवलेल्या विशेष ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत विविध भागांतील चालक कारवाईच्या जाळ्यात अडकले. यामध्ये कोल्हापूर येथील कसबा बावडा परिसरातील ४९ वर्षीय विजयकुमार अनशा बापू उमरडे, संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे येथील अनिल पांडू लमाणे, माभळे गावातील ३१ वर्षीय अमोल अनंत जाधव तसेच कडवई ओकटेवाडी येथील ४६ वर्षीय कृष्णा सोमा ओकटे यांचा समावेश आहे.
याशिवाय राजापूर तालुक्यातील कांजीर्डा येथील महेंद्र हरिश्चंद्र पवार आणि कसबा येथील ३१ वर्षीय सैफ अली खान यांनाही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित सर्व चालकांविरोधात स्वतंत्र गुन्हे नोंदवून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
अपघात रोखण्यासाठी पोलिसांचा कडक इशारा
रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवणे आणि वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांमुळे अनेक निष्पाप कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे अशा चालकांविरोधात यापुढे कोणतीही गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, संगमेश्वर पोलिसांनी रात्रीच्या नाकाबंदीची तीव्रता वाढवली असून, दारू पिऊन स्टेअरिंग हातात घेणाऱ्यांची गाठ आता थेट पोलिस आणि न्यायालयाशीच पडणार असल्याचा कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

