(देवळे / प्रकाश चाळके)
वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणा टाळून तोच पैसा समाजाच्या हितासाठी खर्च करण्याचा आदर्श महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवरुख शहराध्यक्ष तथा नगरसेवक सागर चंद्रकांत संसारे यांनी घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांच्या सोयीसाठी बाकड्यांची व्यवस्था केली असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी बहिर्वक्र आरसेही बसविले आहेत.
क्रांतिनगर, नेहरूनगर, गुरववाडी आणि संत सेनानगर (चव्हाण आळी) या परिसरांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच रस्त्यांवरील अपघातांचा धोका कमी व्हावा आणि वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे सोपे व्हावे, या उद्देशाने बहिर्वक्र आरसे बसविण्यात आले आहेत.
वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा खर्च, जाहिरातबाजी आणि उत्सव यांवर पैसा खर्च करण्याऐवजी त्याचा उपयोग नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी व्हावा, या सामाजिक भावनेतून सागर संसारे यांनी हा उपक्रम राबविला. त्यांच्या या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या उपयोगासाठी काहीतरी करण्याची भूमिका सागर संसारे यांनी कृतीतून दाखवून दिली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च करण्याऐवजी अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असा संदेश त्यांच्या या उपक्रमातून मिळत आहे.


