(मुंबई / वृत्तसंस्था)
महावितरणच्या वीजयंत्रणेतील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, तांत्रिक दुरुस्ती, वीजबिल वसुली तसेच मीटर काढणे यांसारखी तांत्रिक व जोखमीची कामे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून करणे ही तारमार्ग संवर्गातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे अशी कामे कोणत्याही परिस्थितीत खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाकडून करून घेऊ नयेत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. अशा प्रकाराचा आढळ झाल्यास किंवा त्यातून विद्युत अपघात झाल्यास संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाणार आहे.
महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी यासंदर्भात नुकतेच परिपत्रक जारी केले असून, क्षेत्रीय मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंत्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात याबाबत नियमितपणे खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे सुरक्षित संचालन, देखभाल व दुरुस्ती तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे हे संबंधित अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. वीजयंत्रणेतील प्रत्यक्ष कामांसाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तारमार्ग संवर्गात प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीतील बिघाड शोधणे, वीजपुरवठ्याबाबत ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे, वीजबिलांची वसुली करणे तसेच थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढून आणणे ही कामे या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीत येतात.
मात्र, काही तारमार्ग कर्मचारी ही कामे स्वतः न करता खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाच्या माध्यमातून करून घेत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. यासंदर्भातील तक्रारी महावितरणच्या मुख्यालय स्तरावर प्राप्त झाल्या आहेत. वीजयंत्रणेतील कामांसाठी खासगी आणि अनधिकृत व्यक्तींचा वापर करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत व्यक्तींकडे आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि सुरक्षेचे प्रशिक्षण नसण्याची शक्यता असल्याने विद्युत किंवा यांत्रिक अपघात होण्याचा धोका वाढतो. अशा दुर्घटनेत संबंधित खासगी व्यक्ती तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना इजा होण्याची शक्यता असून, वीज ग्राहक आणि महावितरणच्या मालमत्तेचेही नुकसान होऊ शकते.
‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (मेझर्स रिलेटिंग टू सेफ्टी अॅण्ड इलेक्ट्रिक सप्लाय) रेग्युलेशन्स २०२३’ मधील नियम ३ नुसार केवळ अधिकृत व्यक्तींनाच वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करण्याची किंवा विद्युत वाहिन्या व उपकरणांवर काम करण्याची पात्रता आहे. त्यामुळे महावितरणकडून अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या किंवा अपात्र खासगी व्यक्तीला वीजयंत्रणेवर काम करण्याची परवानगी देणे अथवा त्याच्याकडून काम करून घेणे हे बेकायदेशीर व अनधिकृत कृत्य असल्याचे महावितरणने नमूद केले आहे. महावितरणच्या सेवाविनियमांनुसारही ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीत मोडते.
या पार्श्वभूमीवर संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी परिपत्रकाद्वारे कठोर निर्देश दिले आहेत. अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून काम केल्याचे किंवा अशा गैरवर्तणुकीमुळे दुर्घटना, अपघात अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे आढळल्यास संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सेवाविनियमातील तरतुदींनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
तसेच, क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वीज वितरणाच्या कामांमध्ये कोणत्याही परिस्थितीत खासगी किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नाही, याची वेळोवेळी खातरजमा करावी, असे आदेशही संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी दिले आहेत.


