(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश का करण्यात आला नाही, भातपिकावर झालेल्या ‘हळद्या’ प्रादुर्भावाची कारणे काय आहेत आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करावी, या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूण तालुका शाखेने प्रशासनाकडे दोन स्वतंत्र निवेदने सादर केली.
तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार तसेच प्रभारी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदारांकडे ही निवेदने देण्यात आली. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव (बाळा) कदम उपस्थित होते.
दुष्काळ निर्धारणासाठी प्रशासनाने वापरलेल्या पर्जन्यमान, पर्जन्यखंड, पीकस्थिती, जमिनीतील ओलावा तसेच अन्य निकषांचा अधिकृत अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासोबतच महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे गावनिहाय फेरपडताळणी करून प्रत्यक्ष पीकस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि पीकनुकसानीचे मूल्यांकन करावे, अशी मागणीही करण्यात आली.
कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात भातपिकावरील ‘हळद्या’ प्रादुर्भावाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली. बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण, नमुने तपासणी तसेच कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून या प्रादुर्भावाचे शास्त्रीय निदान करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्द्यांबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा संदर्भ देत या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. संबंधित निर्णयप्रक्रिया तसेच त्यामागील कारणमीमांसा पारदर्शकपणे जनतेसमोर आणावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी सचिन कदम, पार्थ जागुष्टे, तीर्था लाड, सचिन चोरगे, सचिन शेट्ये, संदीप राणे, संजय रेडीज, मनोज पांचाळ, राजू विखारे, अजित गुजर, सुरेंद्र शिंदे, संदीप चव्हाण, दीपक कदम तसेच गंगाराम पवार आदी उपस्थित होते.


