(चिपळूण)
राजकारणात शब्दाला जागणारे नेतृत्व अशी ओळख असलेल्या स्व. अजित पवार यांनी दिलेला शेवटचा शब्द त्यांच्या निधनानंतरही खाली पडू दिला गेला नाही. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे झालेल्या आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः उपस्थित राहिल्या. या उपस्थितीने पवार व निकम कुटुंबातील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेची चर्चा होत आहे.
आमदार शेखर निकम यांच्या कन्या मुक्ता आणि ओवळी येथील रवींद्र शिंदे यांचे ज्येष्ठ सुपुत्र अक्षय यांचा विवाह सोहळा आज (शुक्रवारी) सावर्डे येथे पार पडला. या विवाहाला स्वतः उपस्थित राहण्याचा शब्द अजित पवार यांनी निकम यांना दिला होता. इतर शासकीय व राजकीय व्यस्ततेमुळे वेळ जुळवणे कठीण असतानाही दादांनी सुचवलेला मुहूर्तच लग्नासाठी निश्चित करण्यात आला होता आणि त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले होते.
मात्र २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. या धक्क्यातून सावरत असतानाही ‘दिलेला शब्द अपूर्ण राहू देणार नाही’ या तत्त्वावर पवार कुटुंब ठाम राहिले. त्याच भूमिकेतून सुनेत्रा पवार सावर्डे येथे विवाहस्थळी उपस्थित राहिल्या आणि नवदांपत्याला आशीर्वाद दिले. मात्र सुनेत्रा पवारांच्या स्वागतावेळी त्यांना दिलेला पुष्पगुच्छ त्यांनी नाकारल्याचं दिसून आलं.
सुनेत्रा पवार यांच्या आगमनाने विवाहस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित अनेक कार्यकर्ते, नातेवाईक आणि नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या क्षणी स्व. अजित पवार यांची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. मात्र त्यांच्या मूल्यांची, नात्यांची आणि दिलेल्या शब्दाची जपणूक आजही जिवंत असल्याचा अनुभव सर्वांना आला.
या सोहळ्यासाठी सावर्डे येथे भव्य मंडप उभारण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी तसेच चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील हजारो नागरिक या विवाहाला उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ कौटुंबिक न राहता, विश्वास, नातेसंबंध आणि शब्दाची किंमत अधोरेखित करणारा ठरला.
दरम्यान, सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. गोविंदराव निकम यांच्या ‘स्मृतिगंध’ स्मारकाजवळील एक भावनिक क्षणही उपस्थितांच्या लक्षात राहिला. याच ठिकाणी अजित पवार यांच्या हस्ते लावलेले सुरंगीचे झाड आज डौलाने उभे आहे. त्या झाडाजवळ जाऊन सुनेत्रा पवार यांनी वंदन केले. हा क्षण अनेकांसाठी अंतर्मुख करणारा ठरला.
सावर्डेतील हा विवाह सोहळा नात्यांची ऊब, दिलेल्या शब्दाची बांधिलकी आणि अजित पवार यांच्या आठवणी जपणारा भावनिक प्रसंग ठरला. सह्याद्रीच्या कुशीत आजही शब्दाला जागणाऱ्या नेतृत्वाची परंपरा जिवंत असल्याचे चित्र या निमित्ताने संपूर्ण राज्याने पाहिले.
या प्रसंगी आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम, अनिकेत निकम, माजी आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

