(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील कापसाळ-फणसवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्री लोकवस्तीत सुमारे आठ ते साडेआठ फूट लांबीची महाकाय मगर शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अंधाराच्या काळोखात अचानक समोर आलेल्या या सरपटणाऱ्या प्राण्यामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.
लोकवस्तीत मगर शिरल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ नागेश कांबळी यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. कळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनपाल एस. एस. सावंत, रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, वाहन चालक नंदकुमार कदम, प्रणित कलकुटकी आणि अजय बडदे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत संयम आणि शिताफीने मगरीला जेरबंद केले. पकडलेली मगर पूर्ण वाढ झालेली असून तिची लांबी अंदाजे ८ ते ८.५ फूट असल्याचे वनविभागाने सांगितले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर ती सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हे संपूर्ण बचावकार्य विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई-पाटील, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. वनविभागाने वेळेत कारवाई केल्याने संभाव्य अनर्थ टळला असून कापसाळ परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

