(चिपळूण /प्रतिनिधी)
तालुक्यात उघडकीस आलेल्या मुंबईतील मालाड येथील एजाज कुरेशी यांच्या खूनप्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची कारवाई करत गुरुवारी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या आता तिघांवर पोहोचली आहे. सागर संतोष बिरीत (वय ३२, रा. रेहळे-भागाडी, चिपळूण) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने शुक्रवारी त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
रामपूर परिसरातील एका आंबा बागेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी हाडांचे अवशेष आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान चिपळूण पोलिसांसमोर होते. घटनास्थळी मिळालेली अंगठी, दात आणि राखेतील अवशेष यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. वैद्यकीय अहवालात हे अवशेष मानवी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला.
ज्या जमिनीत हे अवशेष सापडले, त्या जागेच्या मालकीचा धागा पकडत पोलिस थेट रामपूर येथील विशाल खोडदेकर याच्यापर्यंत पोहोचले. तपासात विशाल खोडदेकर आणि त्याच्या मैत्रिणीने मुंबईतील मालाड येथे एजाज कुरेशी यांचा खून करून मृतदेह चिपळूणमध्ये आणून स्वतःच्या जागेत पुरल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणाचा छडा लावताना आरोपींना मदत करणाऱ्यांचाही शोध पोलिसांनी सुरू ठेवला आहे. त्यातूनच सागर बिरीत याची भूमिका समोर आली. मृतदेह जाळण्यास त्याने मदत केल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान, या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी विशाल खोडदेकर याच्यावर सावर्डे पोलीस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार आणि फसवणूक केल्याप्रकरणी सुमारे चार महिन्यांपूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या प्रकरणात सावर्डे पोलिस त्याचा शोध घेत होते. सध्या तो चिपळूण पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर सावर्डे पोलिस त्याला ताब्यात घेणार आहेत. चिपळूण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात दाखविलेली वेगवान आणि सूक्ष्म तपासकौशल्याची चर्चा सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

