(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचे सुपुत्र, हरी ओम सत संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अरविंदनाथ महाराज चव्हाण यांना जन कल्याण सेवा समिती, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ह.भ.प. अरविंदनाथ महाराज चव्हाण यांनी अध्यात्म, कीर्तन-प्रवचन आणि समाजसेवेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. साधेपणा, संयमी स्वभाव, सेवाभाव आणि परमार्थनिष्ठा या गुणांमुळे भाविक तसेच समाजबांधवांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष स्नेह आहे. त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून अध्यात्मासोबतच माणुसकी, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जातो.
चिपळूण पंचायत समितीत नोकरीची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी अध्यात्म आणि समाजसेवेची वाटचाल सातत्याने सुरू ठेवली. प्रसिद्धीपासून दूर राहून संप्रदायाची सेवा करत त्यांनी अनेक शिष्य आणि भाविकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे.
राज्यस्तरीय ‘भूषण’ पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल कदम परिवाराच्या वतीने सीताराम कदम यांनी ह.भ.प. अरविंदनाथ महाराज चव्हाण यांचे अभिनंदन केले. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि अखंड आध्यात्मिक सेवा करण्याचे सामर्थ्य मिळावे, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.


