(चिपळूण)
भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत चिपळूण तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. खेर्डी येथे शनिवारी सकाळी आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील अनेक नेत्यांनी भाजपची वाट निवडली.
या पक्षप्रवेशात चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शिवसेना (उबाठा) चे माजी उपशहर प्रमुख समीर टाकळे, महिला आघाडी क्षेत्र अध्यक्षा स्वाती देवळेकर, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) च्या माजी युवती जिल्हाध्यक्षा प्रणिता घाडगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या अल्पसंख्यांक सेलचे उपशहर अध्यक्ष मुख्तार पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
मूळतः हा पक्षप्रवेश सोहळा २८ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेत होणार होता. मात्र, अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील दुर्दैवी निधनामुळे मुख्यमंत्री दौरा आणि सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे हा पक्षप्रवेश सोहळा खेर्डी येथेच पार पडला.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सौ. स्वप्ना यादव, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष व नगरपालिकेतील भाजप गटनेते शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत मोदी यांनी केले, तर आभार प्रदर्शन बळीराम मोरे यांनी केले.

