(दापोली)
तालुक्यातील जि.प.शाळा साखळोली नं.१ येथे मंगळवार दि. 11 मार्च रोजी कोळबांद्रे केंद्राची शिक्षण परिषद जेष्ठ शिक्षक प्रमोद तेवरे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहात आपले विद्यार्थी विविध कौशल्ये कशी आत्मसात करु शकतील, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ प्रभावीपणे शाळेत कसा अमलात आणावा याविषयी, केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी, निपूण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम विषयक, तर मनोहर सनवारे, विलास सकपाळ, आणि विकास पटले यांनी स्काफ (SQAAF) विषयक मार्गदर्शक तत्वे व अभिलेखे कसे तयार करावे याबाबत सखोल माहिती दिली. तसेच सत्यप्रेम घुगे यांनी फोर्टीफाईड तांदूळ गुणवत्ता विषयक समजूती गैरसमजूती सांगत सदर तांदूळ हा प्लास्टीकचा नसून आरोग्यविषयक आवश्यक घटकांचा समावेश करुन तयार केला असून; त्याची गुणवत्ता आरोग्यास किती लाभदायक आहे हे पटवून सांगितले.
शेवटी केंद्रप्रमुख जंगम यांनी प्रशासकीय माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्रातील सर्व शिक्षक उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे गौरव करीत परिषदेची सांगता केली. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करणेत आले. तर शाळेतील मुलींनी सुस्वर ईशस्तवन व स्वागत गीत गायन केले.तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले, तसेच आदर्श पुरस्कार मिळालेबद्दल जंगम व घुगे यांचा शाॅल श्रीफळ देत सन्मान केला; आणि प्रास्ताविक केले. शेवटी समीर ठसाळ यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी प्रमोद तेवरे, संजय जंगम,संजय मेहता,महेंद्र कलमकर,मनोहर सनवारे,शामराव वरेकर यांचेसह केंद्रातील सर्व शिक्षक आदि.उपस्थित होते. शिक्षण परिषद यशस्वी करणेसाठी, विद्यार्थ्यांसह, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैभवी गोरीवले व सर्व सदस्य, सायली तांबे, मनाली तांबे, प्रतिभा देवघरकर तसेच शिक्षक संजय मेहता,समीर ठसाळ, संजय चोरमले, सुरेश पाटील आदिंनी प्रयत्न केले.