(दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध मुरुड समुद्रकिनारी भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवून पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अज्ञात वाहनचालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत बेदरकारपणे वाहन चालविण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप बाळकृष्ण नवले (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इर्टिगा वाहन क्रमांक MH-४२-BJ-४७४६ च्या अज्ञात चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास मुरुड समुद्रकिनारी हा प्रकार घडला. संबंधित चालकाने समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत वाहन अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवले. यामुळे तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला तसेच सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.
या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २८१ आणि १२५ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर मुरुड परिसरातील नागरिक आणि पर्यटकांकडून संबंधित वाहनचालकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
समुद्रकिनाऱ्यांसारख्या गर्दीच्या पर्यटनस्थळी अशा प्रकारे वाहन चालविणे धोकादायक असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

