(लांजा /रत्नागिरी)
बंद घराची कडी-कोयंडा उचकटून चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या दोन संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडल्याची घटना तालुक्यातील रिंगणे-गांगोवाडी येथे शनिवारी सायंकाळी घडली. कारवली येथे दोघांना पकडल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघेही बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. संजय उर्फ मोहन निकाजी भोसले (२१) आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले (२५, दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) अशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
रिंगणे येथील संतोष जयेश आयरे यांचे गांगोवाडी येथे घर आहे. आयरे कुटुंबीय सध्या कामानिमित्त कुर्ला (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नंबरप्लेट नसलेली दुचाकी घराशेजारी उभी करून दोघे घरात शिरले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या जयेश संदीप आयरे (२६) यांच्या निदर्शनास आला. त्यांनी आरडाओरड करताच दोघांनी तेथून पळ काढला. जयेश आयरे यांनी तत्काळ सरपंच संजय आयरे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कोंडगे येथील महेश विश्वासराव आणि कुरंग येथील गणेश सुर्वे यांना माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी एकत्रितपणे चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. झर्ये-कारवली मार्गावर कारवली येथे दोघांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी जयेश आयरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल आशिष शेलार करीत आहेत. जयेश आयरे यांनी आरडाओरड केल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढताना चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य तेथेच टाकले. यामध्ये पोपटपाना, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी सुरा, कटर, हॅण्डग्लोव्हज आणि मास्कचा समावेश आहे. हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एकावर शिराळा आणि इस्लामपूरमध्ये गुन्हे
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी केली असता नितेश उर्फ संतोष मरदान भोसले याच्यावर शिराळा आणि इस्लामपूर येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


