(दापोली)
तालुक्यातील दाभोळ येथील प्राथमिक शाळेतील उपशिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी शिक्षक किशोर काशिराम येवले याला पोलिसांनी अटक केली असून, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्याला तत्काळ निलंबित केले आहे.
सोमवारी घडलेल्या या प्रकाराने दापोली तालुक्यात खळबळ उडाली. पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करून शिक्षकाने अतिप्रसंग केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी संबंधित पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती समोर येताच संतप्त नागरिकांनीही आरोपी शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. प्रकरणाची गंभीर दखल घेत रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी श्री. कासार यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने अहवाल सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वैदेही रानडे यांनी आरोपी शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
शाळेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर खोल परिणाम होत असल्याने पालकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. शिक्षण क्षेत्रातील अशा दुर्दैवी घटनांना तातडीने व कडक कारवाईद्वारे आळा घालावा, अशी मागणी समाजातून होत आहे.

