(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यातील हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून हडपसर पोलिसांनी एका २३ वर्षीय वकिलाला अटक केली आहे. साक्षी संतोष गायकवाड (वय २२) असे मृत तरुणीचे नाव असून, विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये एलएल. बी.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. २०२२ मध्ये कायद्याच्या प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) क्लाससाठी ती हिवरे येथून डेक्कनला ये-जा करत होती. त्यावेळी सासवड येथील विश्वास जगताप हा तिला त्रास देत असल्याचे साक्षीने वडिलांना सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर साक्षीच्या वडिलांनी विश्वास जगताप आणि त्याच्या चुलत्याला घरी बोलावून समज दिली होती. भविष्यात साक्षीला त्रास देणार नाही, असे विश्वासने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही साक्षी आणि विश्वास यांच्यात संबंध होते आणि त्यांच्यात वारंवार वादावादी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास विश्वास हा साक्षीला हडपसर येथील वॉव स्टे लॉजमध्ये घेऊन गेला, अशी माहिती साक्षीच्या वडिलांनी पोलिसांना दिली. दोघे लॉजमधील खोलीत असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर विश्वास जगताप हा रागाने लॉजमधून निघून गेला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर साक्षीने लॉजमधील खोलीच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. विश्वास जगताप याच्या त्रासाला कंटाळून साक्षीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी विश्वास जगताप याला अटक केली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.


