(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात जवळच्या नात्याला काळिमा फासणारी चोरी उघडकीस आली आहे. चुलत काकांच्या घरातून १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षीय पुतण्याने या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांत नवीन महिंद्रा थार गाडी खरेदी केली. धक्कादायक बाब म्हणजे, गाडीच्या पूजेचे निमंत्रण त्याने चोरीचा फटका बसलेल्या काकांनाच दिले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयित पुतण्यासह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफालाही अटक केली आहे.
पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात हा प्रकार घडला. समर पोपट चव्हाण (वय १९) याचे चुलत काका उमेश मारुती चव्हाण यांचे घर शेजारीच आहे. सुमारे महिनाभरापूर्वी समरने संधी साधून काकांच्या घरातील १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. त्यानंतर गावातील सराफ संग्राम बाबासो मोरे याच्या माध्यमातून त्याने हे दागिने विकल्याची माहिती आहे. या व्यवहारातून समरला सुमारे १० लाख रुपये मिळाले आणि त्यातून त्याने नवीन महिंद्रा थार खरेदी केली.
नवीन गाडी घरी आणल्यानंतर समरने तिची पूजा करताना काका उमेश चव्हाण यांनाही निमंत्रित केले. पूजेला जाताना घालण्यासाठी उमेश यांनी आपले दागिने शोधले, तेव्हा ते गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हाच घरात चोरी झाल्याचे उघड झाले. त्यावेळी स्वतःचे आणि पत्नीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातील आजीचे दागिने मात्र सुरक्षित होते. त्यामुळे घरातील किंवा जवळच्या व्यक्तीचा या चोरीत सहभाग असावा, असा संशय कुटुंबीयांना आला. यानंतर उमेश चव्हाण यांनी कोडोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर कोडोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या दरम्यान समरने अचानक महागडी थार गाडी खरेदी केल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली, याची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर समरने काकांच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी समर चव्हाण आणि चोरीचे सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून सराफ संग्राम मोरे या दोघांना अटक केली.
काकांच्या घरातील दागिने चोरून त्याच पैशांत थार खरेदी करणे आणि त्यानंतर गाडीच्या पूजेसाठी काकांनाच निमंत्रित करणे, या प्रकाराची गावात मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत.


