(मुंबई )
महायुती सरकारमध्ये मंत्रिपदांच्या खातेवाटपात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून, अर्थ खात्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, ऊर्जा तसेच इतर महत्त्वाच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतली होती. अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. मात्र आता हे खाते कायम भाजपकडे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थ खाते सोडण्याची तयारी दाखवून बदल्यात महसूल खाते मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे खातेवाटपात मोठा बदल होण्याची शक्यता वाढली आहे.
बावनकुळेंच्या खात्यावर प्रश्नचिन्ह?
सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडील खाते बदलले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीला महसूल खाते देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. बावनकुळेंचा सन्मान राखण्यासाठी त्यांना ऊर्जा खाते देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी यापूर्वी ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळलेली असल्याने त्यांचा अनुभव उपयोगी ठरू शकतो.
शिवसेनेतही बदलांची चर्चा
याशिवाय शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या काही खात्यांमध्येही बदल होऊ शकतात. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या खात्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विरोधकांची टीका
दरम्यान, या संभाव्य बदलांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘मलाईदार खाते’ मिळवण्यासाठी महायुतीतील पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी केला आहे. तथापि, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खातेवाटपातील बदलांच्या चर्चेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या सर्व चर्चा केवळ तर्क-वितर्क असल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय समीकरणे आणि सत्तेतील संतुलन लक्षात घेता, येत्या काळात खातेवाटपाबाबत कोणता अंतिम निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

