(न्यूयॉर्क / वृत्तसंस्था)
संयुक्त राष्ट्रांच्या ८१ व्या महासभेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि लायबेरियाने व्यापारी जहाजे तसेच खलाशांच्या सुरक्षेसाठी ‘ग्रुप ऑफ फ्रेंड्स ऑन सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ शिपिंग अँड सीफेरर्स’ या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने भारतावर दहशतवादाला खतपाणी घातल्याचा आरोप करत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना प्रश्न विचारला. त्यावर जयशंकर यांनी, “एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारत आहे! कमाल आहे,” असे उत्तर दिले.
भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी हरिश पर्वतानेनी यांनी त्यानंतर संबंधित पत्रकाराला, “तुम्हाला तुमचे उत्तर स्पष्ट शब्दांत मिळाले आहे,” असे सांगितले. पाकिस्तानी पत्रकाराने जयशंकर यांना, “भारत सरकार पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी घालणे कधी बंद करणार?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर जयशंकर यांनी वरील प्रत्युत्तर दिले.
हा प्रसंग भारत आणि लायबेरियाच्या सागरी सुरक्षा उपक्रमावरील पत्रकार परिषदेदरम्यान घडला. दोन्ही देशांनी व्यापारी जहाजे आणि त्यावरील खलाशांच्या सुरक्षेसाठी नव्या गटाची स्थापना केली आहे. या गटात जहाजमालकी, जहाज नोंदणी आणि खलाशांशी संबंधित देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत हा खलाशांचा प्रमुख स्रोत देश असून, लायबेरियाकडे टननिहाय जगातील सर्वात मोठी शिपिंग रजिस्ट्री असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये सीमापार दहशतवादाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे आणि पाकिस्तानवर दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. जयशंकर यांनी पाकिस्तानी पत्रकारांच्या दहशतवादावरील प्रश्नांना सडेतोड उत्तर देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीच्या एका संभाषणात, एका पाकिस्तानी पत्रकाराने एस. जयशंकर यांना विचारले होते की, नवी दिल्ली हे काबूल आणि पाकिस्तानसह दक्षिण आशियातील विविध ठिकाणांहून दहशतवाद किती काळ पसरत राहील आणि हा प्रदेश किती काळ युद्धाच्या स्थितीत राहील. जयशंकर यांनी उत्तर दिले होते, “तुम्ही हा प्रश्न चुकीच्या मंत्र्याला विचारत आहात. पाकिस्तान दहशतवादाला आणखी किती काळ पाठिंबा देत राहील, हे फक्त पाकिस्तानी मंत्रीच तुम्हाला सांगू शकतील.”
व्यापारी जहाजांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करताना जयशंकर यांनी तांबडा समुद्र, आखात आणि काळ्या समुद्रापासून विविध सागरी मार्गांवरील घटनांचा उल्लेख केला. व्यापारी वाहतुकीत अडथळा आणणारे आणि निष्पाप लोकांचे जीव घेणारे हे हल्ले अस्वीकार्य असल्याचे त्यांनी म्हटले. सागरी मार्गांवरील सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
या उपक्रमाच्या पहिल्या बैठकीला २५ देश उपस्थित होते. जगातील व्यापारी जहाजांवर जवळपास २० लाख खलाशी कार्यरत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. खलाशांना दीर्घकाळ जहाजांवर राहावे लागणे, क्रू बदलण्यास किंवा मायदेशी परतण्यास होणारा विलंब, कुटुंबापासून दुरावणे आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरला आहे. २३ सप्टेंबर रोजी ओमानजवळ ‘एमव्ही केप दाओ’ (MV Cape Dao) या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, तर जहाजावरील २० भारतीय खलाशांपैकी १९ जणांना सुरक्षित वाचवण्यात आले. भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाने ओमानी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवले होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबवण्याची भूमिका मांडली आहे. हार्मूझची सामुद्रधुनी, तांबडा समुद्र, अदनचे आखात, बाब-अल-मंदेब, आखाती क्षेत्र आणि काळ्या समुद्रातील सागरी मार्गांवर सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. हार्मूझच्या सामुद्रधुनीत २१ सप्टेंबर रोजी केवळ दोन मालवाहू जहाजांनी मार्गक्रमण केले होते, तर संघर्षापूर्वी दररोज सरासरी सुमारे १२५ मोठी व्यापारी जहाजे या मार्गावरून जात असल्याचे वृत्त आहे.
भारत सरकारने संघर्षग्रस्त सागरी भागात कार्यरत भारतीय खलाशांसाठी सुरक्षा सूचना जारी केल्या असून, भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खलाशांसाठी आपत्कालीन मदत नेटवर्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. या यंत्रणेमध्ये संकटाचे संदेश, वैद्यकीय मदत, कुटुंबीयांशी संपर्क आणि आवश्यकतेनुसार बचावकार्य सुलभ करण्याचा उद्देश आहे.
दरम्यान, जयशंकर यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या या प्रश्नोत्तराच्या आदल्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रवेश करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही एका भारतीय पत्रकाराने दहशतवादाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला होता. “पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणे कधी थांबवणार?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरीफ यांनी उत्तर देण्याचे टाळले. त्यांना लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्यावर पाकिस्तान कधी कारवाई करणार, असाही प्रश्न विचारण्यात आला होता, मात्र या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली.


