( नाशिक )
नाशिकमध्ये अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली आर्थिक साम्राज्य उभारणाऱ्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी मुंबई नाका परिसरातील एका बँकेतील लॉकर उघडताना ईडीच्या हाती सोन्या-चांदीसह परकीय चलन आणि कोट्यवधींच्या मालमत्तांची कागदपत्रे लागल्याने खळबळ उडाली आहे.
ईडीच्या तपासात खरात आणि त्याची पत्नी कल्पना यांच्या नावावरील लॉकरमधून सुमारे १ कोटी १० लाख रुपयांचे सोने, १ लाख ८९ हजार रुपयांची चांदी तसेच ५,५०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ५ लाख १७ हजार रुपये) रोख जप्त करण्यात आले आहेत. एवढ्या प्रमाणात परकीय चलन खरातकडे कसे आले, याचा तपास आता ईडीकडून सुरू आहे.
६० बेनामी खाती, ७० कोटींची उलाढाल
ईडीच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातने भक्तांच्या नावावर तब्बल ६० बेनामी बँक खाती उघडल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांना एकाच मोबाईल क्रमांकाची लिंक होती आणि सर्व खात्यांवर खरात स्वतः नॉमिनी होता. या खात्यांमधून आतापर्यंत ७० कोटी रुपयांहून अधिक संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. या सर्व आर्थिक व्यवहारांवर खरातचे थेट नियंत्रण असल्याचेही समोर आले आहे.
मर्सिडीजसह ८० हून अधिक मालमत्तांची कागदपत्रे जप्त
ईडीच्या कारवाईदरम्यान खरातकडे ८० लाख रुपयांची Mercedes-Benz कार तसेच ८० ते ९० मालमत्तांची कागदपत्रे आढळून आली आहेत. दैवी शक्तीचा धाक दाखवून लोकांकडून पैसे उकळणे आणि त्या पैशांतून मालमत्ता उभी करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
या प्रकरणात नाशिकमधील काही राजकीय आणि सफेदपोश व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता ईडीकडून तपासली जात आहे. तपासाचा फोकस आता या आर्थिक जाळ्यामागील ‘बड्या माशां’कडे वळला असून, लवकरच काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

