(देवरुख / वार्ताहर)
श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखतर्फे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या खुल्या लेख स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आयोजकांच्या वतीने स्पर्धेसाठी दोन विषय देण्यात आले होते. ‘डॉ. विजया मेहता यांचे नाट्य चळवळीतील योगदान’ या विषयात देवरुख येथील अदिती भालचंद्र भावे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर ‘वर्तमान जन आंदोलनांची वास्तवता’ या विषयात राजापूर येथील डॉ. राजेंद्र सावळाराम बावळे यांनी प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळविला.
‘डॉ. विजया मेहता यांचे नाट्य चळवळीतील योगदान’ या विषयात देवरुखच्या दीप्ती राजेश भिडे यांनी द्वितीय, तर गोळवली येथील विनायक वसंत पाध्ये यांनी तृतीय क्रमांक मिळविला. गोळवली येथील सौ. अनुश्री दिलीप जाधव आणि सांगली येथील मंजिरी आनंद येडूरकर यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
‘वर्तमान जन आंदोलनांची वास्तवता’ या विषयात काटवली येथील प्रणिता विनायक राईन यांनी द्वितीय, तर पुणे येथील दिनेश सुरेश भदाणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आरवली येथील इशा मंगेश जाबेर आणि दापोली येथील राखी योगेश तोडणकर यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
या लेख स्पर्धेत ‘डॉ. विजया मेहता यांचे नाट्य चळवळीतील योगदान’ या विषयावर एकूण १९ लेख, तर ‘वर्तमान जन आंदोलनांची वास्तवता’ या विषयावर एकूण २६ लेख प्राप्त झाले होते. ‘डॉ. विजया मेहता यांचे नाट्य चळवळीतील योगदान’ या विषयावरील लेखांचे परीक्षण रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील मराठीचे निवृत्त प्राध्यापक आणि संगीत नाटकांचे ख्यातनाम लेखक मा. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले.
‘वर्तमान जन आंदोलनांची वास्तवता’ या विषयावर आलेल्या लेखांचे परीक्षण जांभूळआड, पूर्णगड येथील ‘मातीचा जातीचा शेतकरी’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक तसेच परंपरा व विज्ञान यांची सांगड घालून शेती करणारे प्रगतिशील शेतकरी मा. जयंत गोपाळ फडके यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर, सहाय्यक ग्रंथपाल अमृता इंदुलकर आणि लेखनिक अर्चना राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.


