(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
दीपावलीच्या ऐन सणासुदीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्याला शासनाकडून एक अत्यंत मोठी आणि भरघोस विकासभेट मिळाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दळणवळणाचा कणा असलेल्या रस्ते आणि पुलांच्या रखडलेल्या कामांना आता रॉकेट गती मिळणार आहे. रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) विविध लेखाशीर्षांअंतर्गत तब्बल १३८ कोटी १५ लाख ८२ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे केवळ कागदावर निधी मंजूर न राहता, आता हा निधी प्रत्यक्षात संबंधित ठेकेदारांना वितरित करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले आहे. प्रशासकीय दिरंगाईला बाजूला सारत थेट खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने, रखडलेल्या विकासकामांना प्रत्यक्ष वेग मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिवाळीच्या या आनंदोत्सवात रस्त्यांच्या आणि पुलांच्या विकासाचा हा गाडा अधिक वेगाने धावण्यासाठी वेगवेगळ्या चार प्रमुख लेखाशीर्षांखाली निधीची विभागणी करण्यात आली आहे. यात ग्रामीण भागाला जोडणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गांच्या (प्र.जि.मा.) रस्त्यांसाठी सर्वाधिक वाटा मिळाला आहे. ग्रामीण भागातील दळणवळण सुखकर व्हावे यासाठी प्रमुख जिल्हा मार्गांच्या रस्त्यांच्या कामांसाठी एकूण ८,८४४.२२ लाख रुपयांचा निधी थेट ठेकेदारांना दिला जात आहे. तसेच, पावसाळ्यात किंवा इतर वेळीही वाहतूक खंडित होऊ नये, म्हणून पुलांच्या कामांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्र.जि.मा. पुलांच्या कामांसाठी एकूण १,९८१.३८ लाख रुपये दिले जात आहेत. याशिवाय, राज्य मार्ग रस्त्यांच्या बांधकामासाठी एकूण १,५६७.२४ लाख आणि राज्य मार्गावरील पुलांच्या कामांसाठी एकूण १,४२२.९८ लाख रुपयांचे अनुदान थेट ठेकेदारांकडे वर्ग होत आहे.
एकंदरीत पाहता, दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर चिपळूण विभागाला एकूण ५,५५५.३० लाख आणि उत्तर रत्नागिरी विभागाला सर्वाधिक ८,२६०.५२ लाख रुपयांचा बूस्टर डोस मिळाला आहे. हा १३८ कोटींहून अधिकचा निधी थेट ठेकेदारांच्या हातात पडू लागल्याने, आता निकृष्ट दर्जा किंवा निधीअभावी कामे रखडल्याची कोणतीही सबब ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना सांगता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते आणि जुनाट पुलांचा कायापालट कधी आणि किती दर्जेदार होतो, याकडे आता रत्नागिरीकरांचे बारीक लक्ष असणार आहे.


