( नाणीजधाम / वृत्तसंस्था )
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंदाचार्य संप्रदायाच्या अखिल भारतीय महिला सेनेतर्फे १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील ७४ जिल्ह्यांमध्ये मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत तब्बल ४७१ मंदिरांची आणि मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. या सेवाकार्यात १२,६६० महिला सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला सेविकांनी स्वतःचा संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखत सेवाकार्यात सहभाग घेतला. सेवाकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी आपल्या शिष्यगणांना सातत्याने देत आहेत. त्याच प्रेरणेतून महिला सेविकांनी मंदिर आणि मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही या अभियानांतर्गत मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये खेड तालुक्यातील सुकीवली देऊळवाडी येथील वाघजाई देवी मंदिर, संगमेश्वर येथील जाकमाता मंदिर, राजापूर तालुक्यातील नाटे येथील नवलादेवी मंदिर व नाटेश्वर मंदिर, चिपळूण तालुक्यातील वालोपे येथील झोलाई मंदिर, गुहागर तालुक्यातील चिखली येथील चंडिकाई मंदिर तसेच रत्नागिरी शहरातील किल्ला भगवती मंदिराचा समावेश आहे.
अभियानादरम्यान मंदिर परिसरातील वाढलेले गवत, कचरा, अनावश्यक झाडाझुडपे आणि इतर अस्वच्छता दूर करण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासोबतच गर्भगृहासह संपूर्ण परिसराची श्रद्धापूर्वक स्वच्छता करण्यात आली.
श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. भाविकांना प्रसन्न वातावरणात दर्शन घेता यावे, या उद्देशाने हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


