(गावखडी / वार्ताहर)
गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात गावखडी येथील श्री गणेश भक्तगणांनी बारा दिवसांच्या गणरायाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढत समुद्रकिनारी विसर्जन करण्यात आले.
कोकण आणि गणेशोत्सवाचे नाते अतूट आहे. एरवी भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात; मात्र भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीला घरोघरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करून भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो. गावखडी येथेही गणेशोत्सवानिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पाऊस नसल्याने गणेश विसर्जनासाठी कोणतीही अडचण आली नाही. समुद्रकिनारी विसर्जनावेळी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाकडे आरोग्य, सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. तसेच भातशेती चांगली होऊन पीक हातात यावे, अशी मनोभावे प्रार्थना भक्तांनी केली.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’, ‘एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार’ अशा जयघोषांनी गावखडीचा परिसर दुमदुमून गेला. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
(छाया : दिनेश पेटकर, गावखडी)


