(रत्नागिरी / वार्ताहर)
भारत शिक्षण मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय थ्रीडी रांगोळी स्पर्धेत कुडाळ येथील केदार टेंबकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तानपुरा घेऊन आराम करणाऱ्या आजोबांचे अप्रतिम चित्र त्यांनी रांगोळीतून साकारले. ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून, सलग २४ तासांहून अधिक काळ बसून ही रांगोळी साकारली. मुंबई येथील किशोर पांचाळ यांनी गणपतीची रांगोळी साकारत द्वितीय, तर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा येथील विकास गायकवाड यांनी मासे विकणाऱ्या महिलेची रांगोळी साकारत तृतीय क्रमांक मिळवला. संस्थेचे कार्यवाह धनेश रायकर यांनी ही माहिती दिली.
या स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतून कलाकार सहभागी झाले होते. स्पर्धकांनी सुमारे २५ थ्रीडी रांगोळ्या साकारल्या. प्रत्येक स्पर्धकाला आपली कलाकृती पूर्ण करण्यासाठी एक दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. भारत शिक्षण मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिके अभिषेक सुतार (भांडुप, मुंबई), विजय मेस्त्री (कुडाळ), ओम मोरे (छत्रपती संभाजीनगर), निवृत्ती धुळे (अमरावती) आणि प्रशांत आर्वी (नाशिक) यांनी पटकावली. प्रथम क्रमांकासाठी १२ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ८ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. उत्तेजनार्थ पाच विजेत्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रभावती पिलणकर, विक्रांत मेस्त्री आणि सागर पुसाळकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेतील रांगोळी कलाकृतींचे प्रदर्शन १२ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात गणपती, बाळकृष्ण, मासे विकणारी महिला, खेकडा, फुटबॉलपटू, पुस्तक वाचणारी मुलगी, मराठमोळी महिला, किटलीतून कपात चहा ओततानाचे दृश्य आणि लहान बालक अशा विविध विषयांवरील थ्रीडी रांगोळ्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
यंदा प्रथमच पटवर्धन हायस्कूलमध्ये भारत शिक्षण मंडळाच्या वतीने ‘राज्यस्तरीय रंगयात्रा २०२६ – कलेचा आविष्कार, खरेदीचा बहार’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार असून, ज्वेलरी, कपडे, गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि अन्य आकर्षक उत्पादनांच्या खरेदीची संधी नागरिकांना मिळणार आहे. खरेदीच्या या महोत्सवासोबतच थ्रीडी रांगोळी प्रदर्शन आणि विशेष शोभिवंत मत्स्य प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.
भारत शिक्षण मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त नृत्य, संगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही नागरिकांना अनुभवता येणार आहे. खरेदी, कला, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजन यांचा संगम असलेल्या या महोत्सवाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष सौ. नमिता कीर आणि कार्याध्यक्ष श्री. श्रीराम भावे यांनी केले आहे.


