(संगमेश्वर / एजाज पटेल)
रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक राजकारणाला आज (सोमवारी) नवी दिशा मिळाली. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले मनसेचे आक्रमक नेते जितेंद्र चव्हाण यांच्यावर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे मध्य रत्नागिरीतील मनसे संघटनेला पुन्हा उभारी मिळणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्थापनेपासून पक्षाशी निष्ठा
कडवई येथील रहिवासी असलेले जितेंद्र चव्हाण हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी जोडलेले असून, राज ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पदापुरते राजकारण न करता विविध स्थानिक प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलन करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
यादववाडी पुलाचा प्रश्न असो किंवा कडवई रेल्वे स्थानकावरील सुविधांचा विषय, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आंदोलने आणि जनसंपर्काच्या माध्यमातून ग्रामीण भागात त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे.
राजीनाम्यानंतरही पक्षाशी नाते कायम
सुमारे दोन वर्षांपूर्वी स्थानिक पातळीवरील राजकीय मतभेद आणि अंतर्गत घडामोडींमुळे चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मध्य रत्नागिरीतील मनसेच्या संघटनात्मक हालचाली काही प्रमाणात मंदावल्याचे चित्र निर्माण झाले.
पदावरून बाजूला झाल्यानंतरही चव्हाण यांनी पक्षाशी असलेले नाते कायम ठेवले. विविध राजकीय पक्षांकडून प्रवेशाच्या ऑफर्स मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, आपण कोणत्याही अन्य पक्षात प्रवेश केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पद नसतानाही सामाजिक कार्य आणि जनसंपर्क सुरूच ठेवला.
राज ठाकरेंचा थेट हस्तक्षेप
मध्य रत्नागिरीतील मनसेची संघटनात्मक ताकद पुन्हा वाढविण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी चव्हाण यांना पुन्हा जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या भेटीनंतर चव्हाण यांच्यावर मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली.
या निर्णयामुळे गेल्या काही काळातील अंतर्गत मतभेदांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. विशेषतः चव्हाण यांच्याशी जोडलेले जुने कार्यकर्ते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
चव्हाण यांच्या पुनरागमनामुळे मध्य रत्नागिरीतील मनसेच्या राजकारणाला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. दुरावलेले किंवा निष्क्रिय झालेले कार्यकर्ते पुन्हा संघटनेत सक्रिय करणे, गावागावात पक्षाची शाखा मजबूत करणे आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे, ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केल्यास चव्हाण यांची आक्रमक कार्यशैली पक्षासाठी कितपत प्रभावी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चव्हाण यांच्या पुनर्नियुक्तीमुळे मध्य रत्नागिरीतील मनसेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आता आगामी काळात ते पक्षाची संघटनात्मक ताकद कितपत वाढवतात आणि त्याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“पक्षाशी गद्दारी केली नाही”
“पक्षातील काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अंतर्गत राजकारण केल्यामुळे मी बाजूला झालो होतो. मात्र, माझी पक्षावरील निष्ठा आणि राजसाहेबांवरील विश्वास कायम होता. राजीनाम्यानंतर अनेक ऑफर्स आल्या; मात्र मी पक्षाशी गद्दारी केली नाही. आता राजसाहेबांनी माझ्यावर मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून जिल्ह्यात पक्षाची ताकद दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करेन. राजसाहेबांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
– जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष, मनसे

