(चिपळूण/ रत्नागिरी)
खेड तालुक्यातील पोयनार येथे आयोजित धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांना माजी मंत्री रामदास कदम यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. निमंत्रित लोकप्रतिनिधीशी अर्वाच्च भाषेत बोलून त्यांना कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितल्याचा दावा महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टने केला आहे. या कथित प्रकाराचे पडसाद चिपळूणमध्ये उमटले असून, गवळी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
५ नोव्हेंबर रोजी पोयनार येथे धरणाच्या भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शासनाच्या निमंत्रणानुसार जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाला. यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम कार्यक्रमाला उपस्थित होते. उशिरा येण्यामागील कारण स्पष्ट करण्यासाठी बिरवटकर यांनी योगेश कदम यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलत कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा होता. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर जिल्हा परिषद सदस्य म्हणून अजय बिरवटकर यांचे नावही समाविष्ट करण्यात आले होते. अशा परिस्थितीत शासनाच्या निमंत्रणावर उपस्थित राहिलेल्या लोकप्रतिनिधीला कथितरीत्या अपमानास्पद वागणूक मिळणे हा लोकशाहीतील लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचा प्रश्न असल्याची भूमिका ट्रस्टने मांडली आहे. या घटनेमुळे एका लोकप्रतिनिधीचा नव्हे, तर संपूर्ण गवळी समाजाच्या भावना दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट व समस्त गवळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात न्याय मिळाला नाही आणि अशा प्रकारांना आळा घातला गेला नाही, तर समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या वेळी ज्येष्ठ नेते एस. एम. तटकरे, नितीन ठसाळे, जयद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, मनोज भोजने, सुभाष भोजने, अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, दिलीप माटे, विनोद खताते, अभिजित खताते, विलास वाजे, अजय भालेकर, उमेश महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रांतील गवळी समाजबांधव उपस्थित होते.


