ग्रामस्थाची देवरुख तहसीलदारांकडे तक्रार
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) : तालुक्यातील तुळसणी ग्रामपंचायतच्या हद्दीमधील आकेशियाची झाडे विनापरवाना तोडण्यात आल्याची तक्रार गावातीलच ग्रामस्थ अनंत अमृता मोहिते यांनी देवरुख तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळसणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये ग्रामपंचायत तुळसणीच्या मालकीमध्ये काही वर्षापूर्वीच ग्रामस्थांच्या व शासनाच्या पुढाकाराने गावामध्ये आकेशियाच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. या लागवडीबाबत ग्रामपंचायत तुळसणीला शासनाकडून गौरवपत्र प्राप्त झालेले आहे. मात्र असे असूनसुद्धा विद्यमान सरपंच यांच्या पुढाकाराने तुळसणी आरोग्य उपकेंद्र शेजारील गट क्र. २४० मधील ग्रामपंचायत मालकीची आकेशीयाची वृक्षतोड खुलेआमपणे चालू आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे.
शासन निर्णयाप्रमाणे सदर वृक्षतोड करण्यापूर्वी योग्य त्या शासनाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची मान्यता घेणे व आपल्या खात्याची परवानगी घेणे या सर्व बाबी कायदेशीरपणे होणे गरजेचे होते. मात्र असे झाले नसल्याचे मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. झाडांची होणारी ही कत्तल खुलेआमपणे चालू असून ही अतिशय गंभीर स्वरुपाची बाब आहे.
योग्य कारवाई व्हावी…
या बाबत विद्यमान सरपंच, ग्रामसेविका यांच्या संमत्तीने सध्य स्थितीत ही वृक्षतोड चालू आहे. तरी कृपया आपण याची गंभीर दखल घेऊन झालेल्या वृक्ष तोडीचा तात्काळ आपले स्थरावर पंचनामा करुन जप्त करण्यात यावी व सुरु असणारी वृक्षतोड थांबवण्यात यावी असे तुळसणी येथील अनंत मोहिते यांनी तहसिलदारांना गुरुवारी दिलेल्या निवेनात म्हटले आहे. या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई व्हावी असेही शेवटी मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.