(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
जमिनीच्या वादातून नातेवाईकांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण लागून ७० वर्षीय महिलेवर सहा जणांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील चिखलगाव-वरची जड्यारवाडी येथे घडली. यावेळी महिलेच्या घराच्या परसवणातील नारळ, सुपारी, लिंबू, केळी आणि आंब्याची झाडे तोडून सुमारे ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आनंदी बाप पळसमकर (वय ७०, रा. चिखलगाव-वरची जड्यारवाडी, ता. राजापूर) आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या जमिनीवरून वाद असून, यासंदर्भात राजापूर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल असून तो न्यायप्रविष्ट आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास आनंदी पळसमकर यांच्या घराच्या मागील बाजूस काहीतरी तोडल्याचा आवाज आला. त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता आरोपी त्यांच्या परसवणातील संडासची टाकी तोडत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरोपींना असे का करत आहात, आपण सध्या घरात एकट्या असल्याने काही करू नका, मुले आल्यानंतर किंवा न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काय ते पाहू, असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मात्र, आरोपींनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांच्याशी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. आरोपी क्रमांक चार व पाच यांनी हात धरून दोन्ही हात मुरगळत मारहाण केली आणि संडासच्या टाकीत ढकलून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील बोरमाळ तुटून नुकसान झाले. दरम्यान, आरोपी क्रमांक एक, दोन आणि तीन यांनी परसवणात सुमारे दहा वर्षांपूर्वी लावलेली चार नारळाची, चार सुपारीची, दोन लिंबाची, चार केळीची आणि एक आंब्याची झाडे तोडल्याचा आरोप असून, त्यातून सुमारे ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आनंदी पळसमकर यांच्या फिर्यादीवरून तानाजी उर्फ तान लख पळसमकर (वय ८२), मनोहर तानाजी पळसमकर (५०), रविकांत तानाजी पळसमकर (४३), शशिकांत तानाजी पळसमकर (४५), रमाकांत तानाजी पळसमकर (३५) आणि अनुसया तानाजी पळसमकर (७०), सर्व रा. चिखलगाव-वरची जड्यारवाडी, ता. राजापूर, यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजापूर पोलिस करीत आहेत.


