(रत्नागिरी)
तालुक्यातील गयाळवाडी खेडशी येथील एका नवजात बालकाचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ जुलैच्या पहाटे घडली. या एक महिन्याच्या चिमुकल्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
सौ. शिल्पा विशाल पवार या नवजात बाळाच्या आईने याबाबत माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार, ११ जुलै रोजी रात्री झोपण्याआधी रात्री १ वाजता त्यांनी बाळाला अंगावर दूध पाजले आणि पुन्हा झोपल्या. त्यानंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बाळाला पुन्हा दूध पाजण्यासाठी जागा झाल्या असता बाळात कोणतीच हालचाल दिसून आली नाही. त्यांनी तातडीने वडील संजय जाधव आणि सासू नंदा पवार यांना माहिती दिली.
कुटुंबीयांनी बाळाला तातडीने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती पहाटे ५.४५ वाजता बाळाला मृत घोषित केलं.
प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, बाळाचा मृत्यू “प्रिमेच्युअर बर्थ व कमी वजनामुळे न्यूमोनियाच्या संसर्गामुळे” झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अमृ. क्र. ५६/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम १९४ अंतर्गत करण्यात आली असून, पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

