(राजापूर / तुषार पाचलकर)
प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचलमध्येच असून ते पाचलच्या मध्यवर्ती बाजारपेठ परिसरात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कार्यालयाच्या जागेबाबत अथवा स्थानाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाचल तालुका निर्मिती कृती समितीने केले आहे. त्याचबरोबर माजी सरपंच अशोक सक्रे यांनीही पाचलमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थेचा दाखला देत अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचलच सर्वाधिक सक्षम पर्याय असल्याचे म्हटले आहे.
कृती समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचलमध्ये जागेची कोणतीही अडचण नाही. बाजारपेठ परिसरासह लगतच्या भागात आवश्यक शासकीय जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जागेअभावी कार्यालय अन्यत्र हलविण्याची चर्चा तथ्यहीन असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
समितीच्या मते, पाचलमधील बहुतांश शासकीय कार्यालये स्वतःच्या जागेत कार्यरत असून ती एकमेकांच्या जवळ आहेत. महसूल, बँकिंग, पोस्ट, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि इतर सार्वजनिक सेवा देणारी कार्यालये बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर असल्याने नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात सहज जाता येते.
याशिवाय पाचलमध्ये बँका, पोस्ट कार्यालय, महा-ई-सेवा केंद्रे, शैक्षणिक संस्था, मेडिकल दुकाने, दवाखाने, कृषी सेवा केंद्रे, व्यापारी आस्थापने, एसटी बसस्थानक तसेच खासगी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व आवश्यक सेवा एकाच परिसरात मिळू शकतात. यामुळे वेळ, पैसा आणि प्रवासाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचे समितीने नमूद केले आहे.
अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करताना उपलब्ध पायाभूत सुविधा, प्रशासकीय सुसूत्रता आणि सर्वसामान्य नागरिकांची सोय या निकषांना प्राधान्य देणे आवश्यक असून, या सर्व बाबींमध्ये पाचल बाजारपेठ सर्वाधिक सक्षम आणि नैसर्गिक पर्याय ठरते, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पाचलचे माजी सरपंच अशोक सक्रे यांनीही पाचलच्या बाजूने भूमिका मांडताना सांगितले की, पाचल हे अनेक दशकांपासून पंचक्रोशीचे प्रमुख सेवा केंद्र आहे. येथे महसूल मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, कृषी मंडळ अधिकारी कार्यालय, महा-ई-सेवा केंद्रे, आधार नोंदणी केंद्र, उपपोस्ट कार्यालय, विविध बँका, एटीएम, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल, एसटी नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, शासकीय गोदाम, शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा, पशुवैद्यकीय दवाखाना अशा ५२ हून अधिक शासकीय व सार्वजनिक सेवा उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे, पाचल येथे यापूर्वी नायब तहसीलदार कार्यालय कार्यरत होते. कोरोना काळातील विशेष परिस्थितीमुळे त्याचे कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यामुळे महसूल प्रशासनाचा अनुभव आणि आवश्यक पायाभूत सुविधा पाचलकडे आधीपासूनच उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या काही दिवसांत पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधल्यानंतर एकच भावना प्रकर्षाने जाणवत असल्याचे सक्रे यांनी सांगितले. “आमची बँक पाचल येथे बाजार पाचलात, दवाखाना पाचलात, शाळा-महाविद्यालय पाचलात आणि सरकारी कामेही पाचलातच होतात; मग अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी दुसऱ्या गावात का जावे?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ही कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका नसून सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, मजूर आणि व्यापाऱ्यांच्या सोयीची मागणी आहे. सरकारी कार्यालये ही पुढाऱ्यांच्या नव्हे, तर जनतेच्या सोयीसाठी असतात. त्यामुळे शासनाने वस्तुस्थितीचा विचार करून पाचलमध्येच अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, तसेच नागरिकांनी हरकतीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन जनहिताची भूमिका शासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन अशोक सक्रे यांनी केले.

