(संगमेश्वर /प्रतिनिधी)
रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. गोवरेवाडी बसथांब्याजवळ हा अपघात घडला असून, अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुरेश शामराव साळोखे (वय ६६, रा. कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील एमएच-०९-ईएल-२६०८ क्रमांकाच्या रिक्षातून कोल्हापूरहून गणपतीपुळेकडे निघाले होते. रिक्षामध्ये पेढ्यांचे बॉक्स भरलेले असून, गणपतीपुळे येथील दुकानदारांकडे माल पोहोचवण्यासाठी ते जात होते. पहाटे चार ते पाचच्या सुमारास आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ आल्यानंतर रिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, चालक रिक्षाखाली अडकून पडला होता. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकाला बाहेर काढून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले. दरम्यान, साखरपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा अधिक तपास सुरू केला आहे.

