(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील साखरी-नाटे बंदर हे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मच्छीमारी बंदर मानले जाते. या बंदरावर दररोज शेकडो लहान-मोठ्या बोटी आणि लाँचेस अरबी समुद्रात जाऊन मासेमारी करून परततात. स्थानिक अर्थव्यवस्थेत आणि मच्छीमारांच्या उपजीविकेत या बंदराचे प्रचंड महत्त्व आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून जैतापूर सुरू बन आणि घेरा-यशवंतगड परिसरातील निमुळत्या खाडीच्या प्रदेशात प्रचंड प्रमाणावर गाळ साचल्याने या बंदरात शिरताना मच्छीमारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बोटी अडकण्याच्या वारंवार घटना
मासेमारी करून परतताना बंदराकडे शिरताना बोटींचा वेग मंदावतो आणि गाळात अडकण्याच्या घटना वारंवार घडतात. विशेषतः ओहोटीच्या काळात ही समस्या अधिक तीव्र स्वरूप धारण करते. अनेकदा बोटी खाडीतच अडकून बसतात. त्यामुळे मच्छीमारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. या दरम्यान बोटीचे यांत्रिक नुकसान होतेच, शिवाय मोठ्या प्रमाणावर मासळीही खराब होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
मच्छीमारांच्या उपजीविकेवर संकट
संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मच्छीमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. साखरी-नाटे बंदरातून होणारी मासळी विक्री केवळ स्थानिकच नव्हे तर जिल्हा व राज्याच्या बाजारपेठेसाठी महत्त्वाची आहे. मात्र या गाळामुळे मच्छीमारांचा परतीचा प्रवास धोकादायक ठरत असून त्यांच्या उपजीविकेवर गदा येत आहे. “समुद्रात जाऊन जीव धोक्यात घालून मासेमारी केली, तरी परतताना बंदरात शिरणे हेच संकट ठरत आहे,” असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.
शासनाने तातडीने गाळ उपसा करावा – वजूद बेबजी
या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मच्छीमारांनी आवाज उठवला आहे. साखरी-नाटे मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमन वजूद बेबजी यांनी सांगितले की, “संपूर्ण जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे बंदर असताना येथे वारंवार बोटी अडकण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने गाळ उपसणीचे काम हाती घेतले पाहिजे. अन्यथा मच्छीमारांची उपजीविका धोक्यात येईल.”
ठोस उपाययोजनेची मागणी
स्थानिक मच्छीमारांच्या संघटनांनी प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय खात्याकडे गाळ उपसणीची मागणी केली आहे. त्याचबरोबर, या भागाचा भौगोलिक अभ्यास करून दीर्घकालीन नियोजनाद्वारे बंदर सुस्थितीत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मच्छीमारांचे सरकारला आवाहन
मच्छीमारांचे म्हणणे आहे की, “आम्ही समुद्रात जाऊन जीव धोक्यात घालून काम करतो. परंतु गाळामुळे रोजच्या रोज संकट ओढवते. जर शासनाने लक्ष दिले नाही, तर येत्या काही वर्षांत साखरी-नाटे बंदराची मच्छीमारी क्षमता कमी होईल आणि जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होईल.” स्थानिक मच्छीमारांनी शासनाला तातडीने गाळ उपसणीचे काम सुरू करून या गंभीर प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

