(खेड / रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने औषधांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याची घटना खेड येथील हॅप्पी पंजाबी धाब्याजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल श्रीहुबराज यादव (वय ३१, रा. पुरनपूर, ता. किराकत, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) हे त्यांच्या ताब्यातील MH 04 JU 9439 क्रमांकाच्या ट्रकमधून औषधांची वाहतूक करीत भिवंडीहून गोव्याच्या दिशेने जात होते. २३ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता त्यांचा ट्रक खेड येथील हॅप्पी पंजाबी धाब्याजवळ मुंबई-गोवा महामार्गावर आला. याचवेळी गणेश रामू वजरे (रा. जवाहर, जि. पालघर) हे MH 08 AC 1367 क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने चालवत ट्रकच्या पाठीमागून आले. त्यांनी ट्रक कंटेनरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने गणेश वजरे जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले.
या अपघातास दुचाकीस्वार गणेश वजरे यांचा भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा प्रकार कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.


