(चिपळूण/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील क्षेपण हद्दीतील वालोपे येथे घडलेल्या भीषण अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातात चार वर्षीय चिमुकलीसह तिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत सुरक्षाविषयक प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मौजे वालोपे गावातील वरचीवाडी येथील भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षण भिंती उभारण्याची मागणी केली. तसेच सर्विस रोड आणि अंतर्गत रस्त्यांना डांबरी अॅप्रोच देण्यात यावा, अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली. रेल्वे स्टेशन रोडवरील सब-वे परिसरात अपुरी प्रकाशव्यवस्था असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. सब-वे परिसरात अनधिकृतपणे पार्किंग होणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय गणेशवाडी येथील संदीप मोरे यांच्या घरालगत संरक्षण भिंत उभारणे, आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक बसविणे तसेच महामार्गालगतच्या वस्त्यांजवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंग उभारण्यात यावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष कामांना तातडीने सुरुवात करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी लावून धरली. या आंदोलनात अशोक आयरे, दीपेश आयरे, रवींद्र तांबिटकर, विकास गुरव, प्रतीक सुर्वे, राजेंद्र सोलकर आणि निलेश कदम आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

