(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहराजवळील मिरजोळे येथील हनुमाननगर–समर्थनगर मार्गावर शनिवारी रात्री दोन अवाढव्य गव्यांचे अचानक दर्शन घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भररस्त्यावर येऊन उभे राहिलेल्या गव्यांमुळे मिरजोळे गावाकडे जाणारी वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. रस्त्याच्या मधोमध शांतपणे उभे असलेल्या गव्यांमुळे वाहनचालकांची चांगलीच पंचाईत झाली.
शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास मिरजोळे येथील काही रहिवासी घरी परतत असताना रस्त्याच्या मध्यभागी दोन जनावरे उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला ही पाळीव जनावरे असावीत, असा अंदाज होता. मात्र चारचाकी वाहनांच्या प्रकाशात सफेद पाय आणि तपकिरी रंगाची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसताच ती गवे असल्याचे लक्षात आले. वाट चुकल्यामुळे हे गवे मिरजोळेच्या रस्त्यावर आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या मधोमध उभे असल्याने त्यांच्या बाजूने वाहन नेणे अत्यंत धोकादायक होते. त्यामुळे वाहनचालकांनी थांबणेच पसंत केले. बराच वेळ उलटून गेला तरीही गव्यांनी हालचाल न केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या अवाढव्य गव्यांना पळवून लावण्याचे धाडस कुणीही करू शकले नाही. अखेर स्थानिक नागरिकांनी फटाक्यांचा आवाज केल्यानंतर त्या मोठ्या आवाजाने गवे घाबरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकून पळून गेले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
या परिसरात सुमारे १५ ते ३० घरे असून, मिरजोळे परिसरात गव्यांचे दर्शन होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गव्यांच्या या अचानक वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

