( चिपळूण )
चिपळूणमध्ये गंधरेश्वर पुलावर एका महिलेच्या चप्पला व पर्स आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने नदीत उडी घेऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता महिलेचे नाव अपेक्षा अमोल चव्हाण (रा. शिवधामपूर, संगमेश्वर) असे आहे. मंगळवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास त्या घरातून काहीही न सांगता बाहेर पडल्या. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने संगमेश्वर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
मोबाईल लोकेशनच्या आधारे नातेवाईकांनी चिपळूणमधील गंधरेश्वर पुलावर शोध घेतला असता, त्यांच्या चप्पला व पर्स आढळून आली. यामुळे तिने नदीत उडी घेतल्याचा संशय अधिक वाढला झाला आहे. तरीदेखील पोलिसांचा तपास दुसऱ्या दिशेनेही सुरू आहे. महिलेने हा प्रकार केवळ नाट्य रचून जवळच असलेल्या रेल्वे स्थानकातून अज्ञात स्थळी प्रस्थान केले आहे का? अशीही शक्यता चिपळूण पोलिस तपासत आहेत.
विशेष म्हणजे, गंधरेश्वर पुलावर यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. यावर्षी जुलै महिन्यात धुळे येथील तरुण दाम्पत्याने याच पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतली होती. त्यानंतर पोलिस व एनडीआरएफच्या पथकाला मोठा शोधमोहीम राबवावी लागली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने या पुलावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलीस तपासामधून ही नक्की काय घटना आहे, याचा उलगडा होणार आहे.

