( चिपळूण / वार्ताहर )
दसपटी विभागातील टेरव येथील ज्येष्ठ साहित्यिक, संवेदनशील लेखक-कवी तसेच जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई-टेरव या संस्थेचे मा. अध्यक्ष ॲड. यशवंत बाबुराव कदम (नमनेश्वर) यांचे वयाच्या ७८व्या वर्षी गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य, न्याय, प्रशासकीय सेवा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मूळगावी टेरव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ॲड. कदम यांनी आयकर विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली होती. कायदा आणि प्रशासन क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी मराठी साहित्य, संस्कृती, अध्यात्म तसेच सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. संवेदनशील लेखन, काव्यनिर्मिती आणि सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला.
‘फुलोरा’, ‘जीवनगाणे’, ‘अंतरंग’, ‘भक्तिरंग’, ‘बोलके झाड’, ‘महामानव…’, ‘जय दुर्गे आरती संग्रह’, ‘श्री कुलस्वामिनी आई भवानी देवस्थानचा समग्र इतिहास’, ‘आकाशाचे पंख’, ‘अंतरीचा दीप’, ‘गडगडीचा डोह’, ‘देव माणूस’ आणि ‘वळणावळणाची वाट’ आदी विविध साहित्यकृती त्यांच्या लेखणीतून साकारल्या. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत वंदना प्रकाशनाचा जीवनगौरव पुरस्कार तसेच विविध साहित्यिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
‘आरती संग्रहा’तील श्री कुलस्वामिनी भवानी मातेची आरती त्यांच्या लेखणीतून साकारलेली महत्त्वपूर्ण साहित्यकृती मानली जाते. श्री क्षेत्र टेरव येथील मंदिरातील ही आरती भक्तिभावाने निनादत राहील, अशी भावना त्यांच्या कार्याशी संबंधित व्यक्तींमधून व्यक्त होत आहे.
टेरवच्या मातीशी ॲड. कदम यांचे अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते होते. गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी ते अखेरपर्यंत जोडलेले राहिले. साहित्य, समाजसेवा आणि न्यायक्षेत्रातील त्यांचे योगदान तसेच टेरव गावाशी असलेली आत्मीयता यामुळे त्यांचे कार्य ग्रामस्थांच्या स्मरणात राहणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, सगे-सोयरे, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.


