(जैतापूर / वार्ताहर)
शालेय पोषण आहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाटे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करत आज सुमारे ५० ते ६० पालकांनी शाळेत उपस्थित राहून आपली भूमिका शांततापूर्ण आणि सकारात्मक पद्धतीने मांडली. प्रभारी शिक्षकांकडे याबाबत विचारणा केल्यानंतर ही बाब संस्था अध्यक्ष तथा सरपंच यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
काल शाळेच्या गेटबाहेर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना रोखण्यात आल्याच्या घटनेबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारांमुळे मुलांच्या शिक्षणावर आणि बालमनावर विपरीत परिणाम होतो, असे स्पष्ट करत संबंधित शिक्षकांना तात्काळ शाळेत रुजू करून शैक्षणिक कामकाज सुरळीत सुरू करण्याची मागणी पालकांनी केली.
सकाळी दहा वाजल्यापासून शाळेबाहेर पालकांची उपस्थिती वाढू लागली. साडे दहाच्या सुमारास उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व संस्था सदस्यांशी संवाद साधताना पालकांनी स्पष्ट प्रश्न उपस्थित केला की, संबंधित शिक्षकांचे निलंबन झालेले नसताना त्यांना शाळेबाहेर का ठेवले जात आहे? विशेषतः इयत्ता दहावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना मुख्य गणित विषय शिकवणारे शिक्षक बाहेर ठेवले जाणे हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे पालकांनी नमूद केले. यासोबतच मुख्याध्यापकांनाही शाळेबाहेर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर होणाऱ्या परिणामाबाबतही पालकांनी चिंता व्यक्त केली.
शालेय पोषण आहार प्रकरणातील घटनेचे कोणीही समर्थन करत नसल्याचे स्पष्ट करत, संबंधित प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना आणि संस्थेकडून निलंबन न झालेल्या शिक्षकांना बाहेर ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी ठाम भूमिका पालकांनी मांडली. त्यामुळे शिक्षकांना तात्काळ शाळेत घेऊन नियमित अध्यापन सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीही श्री. करे सर हे उत्तम पद्धतीने गणित विषय शिकवत असल्याने त्यांना लवकरात लवकर वर्गावर पाठवावे, अशी विनंती संस्था अध्यक्षांना निवेदनाद्वारे केली आहे. शाळेच्या गेटबाहेर विद्यार्थ्यांना रोखल्यामुळे काही विद्यार्थी घरी परतले, रस्त्यालगत शाळा असल्याने अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा मुद्दाही पालकांनी उपस्थित केला. भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य झाल्यास आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किंवा इतर नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करावी, अशी मागणी पालकांनी केली.
शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. आपल्या पाल्यांचे, विशेषतः दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्व पालकांनी एकत्र येत सकारात्मक भूमिका घेतली असून श्री. करे सर आणि मुख्याध्यापक यांना शाळेबाहेर न ठेवता तात्काळ रुजू करावे, अशी सामूहिक विनंती निवेदनाद्वारे देण्यात आली.
यावेळी पालकांसह सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालकांच्या मागण्यांना पाठिंबा देत शिक्षणव्यवस्था सुरळीत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

