(चिपळूण / रत्नागिरी)
ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी निघालेल्या पत्नीला पतीने हेल्मेट घालून येत काठीने बेदम मारहाण केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री सती येथील चैतन्य क्लिनिकसमोर घडली. या हल्ल्यात महिलेच्या डोक्यासह उजव्या हातावर आणि डाव्या पायाच्या मांडीवर दुखापत झाली. याप्रकरणी पतीविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानसी महेंद्र डांगरे (वय ४५, रा. सती, सहारा बिल्डिंग, चिपळूण) या येथील एका क्लिनिकमध्ये ड्युटीवर होत्या. २३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता ड्युटी संपल्यानंतर त्या क्लिनिकच्या प्रवेशद्वारासमोरून घरी जाण्यासाठी निघाल्या. त्याचवेळी त्यांचे पती महेंद्र हरिश्चंद्र डांगरे (वय ५५, रा. पोफळी, ता. चिपळूण) हे हेल्मेट घालून तेथे आले. महेंद्र यांनी काठीने मानसी यांच्या डोक्यात, उजव्या हातावर तसेच डाव्या पायाच्या मांडीवर मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्या जखमी झाल्या.
या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.


